Home क्रीडा यंदाच्या आयपीएल हंगामात होणार सर्वाधिक सामने

यंदाच्या आयपीएल हंगामात होणार सर्वाधिक सामने


मुंबई-वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 19वा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत असून 31 मे रोजी अंतिम सामन्याने स्पर्धेची सांगता होणार आहे. यंदाचा हंगाम आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे. एकूण 10 संघांमध्ये 84 सामने खेळवले जाणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा उत्सव ठरणार आहे.

स्पर्धेचा उद्घाटन सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या 28 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीतील 20 सामन्यांचे वेळापत्रकच जाहीर झाले आहे.

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे 10 संघ सहभागी होत आहेत.

अंतिम सामना 31 मे रोजी बंगळुरूमध्ये खेळवला जाणार असून प्लेऑफ सामने 26 मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील 13 शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियममध्ये तब्बल 13 वर्षांनंतर IPL सामना होणार आहे.

यंदा काही महत्त्वाचे नवे नियमही लागू करण्यात आले आहेत. सामन्याच्या दिवशी कोणत्याही संघाला नेट सराव करता येणार नाही. खेळाडूंना टीम बसनेच प्रवास करावा लागेल आणि कुटुंबीयांना मर्यादित प्रवेश असेल. तसेच ड्रेस कोडबाबतही काही बंधने घालण्यात आली आहेत.

गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पहिल्यांदाच IPL विजेतेपद जिंकत इतिहास रचला होता. त्यांनी अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला होता. यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला कोलकाता नाइट रायडर्सने ₹25.20 कोटींना विकत घेतले.

IPL 2026 चे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येतील, तर जिओ हॉटस्टारवर त्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. त्यामुळे यंदाचा IPL हंगाम अधिक भव्य आणि रोमांचक ठरण्याची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound