मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असल्याने मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर टांगती तलवार आहे. मात्र विधीमंडळाच्या 288 सदस्यांचा म्हणजे नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या (6 नोव्हेंबर) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हा मुहूर्तही पुढे ढकलला गेल्याची सूत्रांनी सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या 288 विधीमंडळ सदस्यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. येत्या 13, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी विधीमंडळ सदस्यांचा शपथविधी होईल. त्यावेळी निवडून आलेले 288 आमदार शपथ घेतील. सध्या भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे. या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर कारभाराची सर्व सूत्र राज्यपालांकडे जातील आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.