जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचला असून, प्रभाग ११ मध्ये महायुतीचे पारडे जड होताना दिसत आहे. रविवारी सकाळी रामानंद नगर परिसरात महायुतीचे उमेदवार सिंधुताई विजय कोल्हे, ललित विजय कोल्हे, डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष पाटील यांचा भव्य प्रचार दौरा अत्यंत उत्साहात पार पडला. या दौऱ्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

विठूरायाचे घेतले दर्शन :
आजच्या रॅलीची सुरुवात रामानंद नगर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनाने झाली. प्रभू पांडुरंगाला वंदन करून आणि विजयासाठी साकडे घालून या रॅलीचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी ‘जय श्रीराम’ आणि ‘विजयी असो’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

कामाच्या पावतीवर मतदारांचा प्रतिसाद :
ही प्रचार रॅली रामानंद नगर, नेहरू नगर, जीवन नगर, शास्त्री नगर, अंबिका सोसायटी, मुंदडा नगर आणि कोल्हे नगर या भागातून काढण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या कार्यकाळात सिंधुताई कोल्हे आणि ललित कोल्हे यांनी नगरसेवक म्हणून या प्रभागात भरीव कामे केली आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले गटारींचे प्रश्न आणि अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावल्यामुळे नागरिकांमध्ये या उमेदवारांविषयी कृतज्ञतेची भावना दिसून आली. रॅली दरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी या लोकप्रतिनिधींचे औक्षण करून आणि फुले उधळून स्वागत केले.
नवे नेतृत्व अन् अनुभवी जोडी :
यावेळी डॉ. अमृता सोनवणे आणि संतोष पाटील यांनीही मतदारांशी थेट संवाद साधला. “अनुभवी नेतृत्व आणि नवीन दृष्टिकोन यांचा संगम असलेल्या महायुतीला विजयी करा, जेणेकरून प्रभागाचा कायापालट करता येईल,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ठिकठिकाणी ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह यामुळे ही रॅली केवळ प्रचार न राहता एक विजयी संकल्प सभा ठरली. प्रभागातील विकासाची गंगा अखंड वाहती ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना संधी देण्याचा सूर मतदारांमध्ये दिसून आला. या भव्य रॅलीमुळे प्रभाग ११ मधील प्रचारात महायुतीने मोठी आघाडी घेतल्याची चर्चा आता जळगाव शहरात सुरू झाली आहे.



