
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव बसस्थानक प्रशासनाने सतर्कता दाखवली असली, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकातील पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.


जळगाव बसस्थानकातील पोलीस कक्ष नागरिकांसाठी केवळ एक शोभेची वस्तू ठरत आहे. या ठिकाणी २४ तास पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बसस्थानकात गैरप्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याचा फायदा चोरांना मिळण्याची शक्यता आहे. महिलांच्या बॅगा आणि मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
जळगाव बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलीस चौकीत २४ तास पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि बसस्थानकात नियमितपणे गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत


