यावलच्या जीर्ण झालेल्या बसस्थानकाच्या इमारत पुर्नबांधणीचा प्रश्न प्रलंबीत राहिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील अनेक वर्षापासुन पुर्नबांधणीच्या प्रतिक्षेत असलेल्या यावल बसस्थानक हे समस्यांचे माहेरघर बनले असुन, प्रवाशांची नेहमीच गैरसोय होत असल्याने या जीर्णअवस्थेत असलेल्या बसस्थानकाचा कायापालट कधी होणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. प्रशासनाने प्रवाशांशी निगडीत बसस्थानकाच्या इमारत पुर्न बांधणीच्या या प्रलंबीत प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत करुन नवीन बसस्थानक इमारत बांधावी अशी अपेक्षाकृत मागणी लालपरीवर प्रेम करणाऱ्या प्रवाशी मंडळीकडून करण्यात येत आहे.

गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांशी जोडला गेलेला व जवळपास ८० गावांशी जोडला गेलेल्या यावल तालुक्याची जळगाव जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो, शिवाय यावल तालुक्यात खान्देश निवासनी श्री मनुदेवी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज देवस्थान व फैजपुर शहरात प्रतिवर्ष भरणारी श्री खंडेराव महाराज यांची यात्रा या निमित्ताने यावलच्या बसस्थानकावरून नेहमीच दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते.

यासह आपल्या दैनंदिन कामासाठी, बाजारपेठ आणि शिक्षण घेणारे विदयार्थी बसस्थानकावरून लालपरीने प्रवास करणाऱ्यांची वर्दळ असते, असे असतांना देखील यावलच्या बसस्थानकाची ७० ते ८० वर्षापुर्वीची जीर्ण व अत्यंत जुनाट असलेली इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असुन या ठिकाणी सुसज्ज अशा बसस्थानक बांधण्यात यावे अशी मागणी आहे. असे असतांना देखील प्रवासांच्या या विषयाकडे लोकप्रतिनिधी यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांचे या प्रश्नाकडे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी महामंडळाने प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष देऊन यावल बसस्थानक इमारतीची पुर्नबांधणीस सुरूवात करावी.

Protected Content