शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावामध्ये नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट गुरांचे टोळके गावातील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने रहदारीच्या वेळी अनेकवेळा या मोकाट गुरांकडून रस्ते अडवून वाहतूक कोंडी निर्माण केली जात आहे.
वाहतूकीची कोंडी झाल्यामुळे छोटे मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे, अनेकवेळा रस्त्याने वापरणाऱ्या लहान मुले व महिलांना या गुरांकडून ईजा पोहचविण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे शाळकरी मुले व महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेंदूर्णी नगरपंचायत व पीक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून संयुक्त कारवाई करण्याचे ठरले असतांनाही पुढे कुठलीही कार्यवाही न झाल्याने मोकाट गुरे अजूनही रस्त्यावर फिरताना पादचारी लोकांना त्रास देत आहेत. वेळीच या गुरांचा बंदोबस्त केला नाही, तर मोठा अपघात होऊ शकतो.
नगरपंचायतीने त्वरित शहरातील या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा व गावात मोकाट गुरे सोडणाऱ्या गुरे मालकांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे. तसेच गावा शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतातही मोकाट गुरे घुसून पिकांची नासाडी करत असल्याने या गुरांवर कारवाई करण्यात यावी, म्हणून पीक संरक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केली आहे.