Home Uncategorized जळगावात वाढली उन्हाची तीव्रता !

जळगावात वाढली उन्हाची तीव्रता !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी (१० मार्च) शहराचे कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ममुराबाद येथील हवामान वेधशाळेच्या नोंदीनुसार गेल्या काही दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या चार दिवसांत तापमान सुमारे तीन अंशांनी वाढल्याने सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दुपारच्या सुमारास शहरातील अनेक रस्ते तुलनेने ओस पडलेले दिसून येत आहेत.

राज्यातील तापमानाच्या नोंदीत अकोला येथे सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून त्यानंतर जळगावचा क्रमांक लागतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच हलके व सुती कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांतही तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.


Protected Content

Play sound