Home Cities यावल पंचनामा झाला, त्रुटीही उघड झाल्या ; मग बिल काढण्याची घाई कशासाठी? भाजप...

पंचनामा झाला, त्रुटीही उघड झाल्या ; मग बिल काढण्याची घाई कशासाठी? भाजप गटनेत्या नंदा महाजनांचा यावल नगरपरिषद प्रशासनाला खरमरीत सवाल!

0
4


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत यावल नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात गंभीर त्रुटी समोर आल्यानंतरही देयके अदा करण्याच्या घाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या तथा नगरसेविका सौ. नंदा राजेंद्र महाजन यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे. कामाची सखोल चौकशी करून सर्व दोष दूर होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे बिल अदा करू नये, अशी आक्रमक मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारामार्फत काम सुरू असले तरी प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाला असून अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कामाची पाहणी व रीतसर पंचनामा होऊन त्रुटी उघड झालेल्या असतानाही प्रशासनाकडून देयक मंजुरीसाठी घाई दाखवली जात असल्याने संशय निर्माण झाला आहे. कंत्राटदारावर नियंत्रण ठेवणाऱ्या पीएमसी (PMC) एजन्सीने पर्यवेक्षण आणि गुणवत्तेची तपासणी योग्य प्रकारे केली आहे का, याबाबतही महाजन यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी जोडलेला विषय असल्याने सरकारी निधीच्या अपव्ययावर त्यांनी कडक आक्षेप नोंदवला आहे.

स्वच्छ भारत मिशन (शहरी) २.० अंतर्गत शहराला कचरामुक्त (Garbage Free) करण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि वैज्ञानिक प्रक्रिया होणे अनिवार्य आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासनाने तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून चौकशी करावी आणि कंत्राटदाराकडून सर्व त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात, अशी ठाम भूमिका सौ. नंदा महाजन यांनी घेतली आहे.


Protected Content

Play sound