नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोलकाता येथे बांगलादेशविरूद्ध डे-नाईट कसोटीनंतर वेस्ट इंडीजचा संघ भारत दौर्यावर येणार आहे. भारत-वेस्ट इंडीज संघात टी-२० आणि एकदिवसीय मालिका ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा उद्या होणार आहे.
दरम्यान, भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी रोहित शर्माला एकदिवसीय संघात स्थान मिळणार नसल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. रोहित शर्माच्या जागी भारताला मयंक अग्रवालच्या रुपात नवीन सलामीचा फलंदाज मिळू शकतो. मयंकने बांगलादेश विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात दमदार द्विशतकी कामगिरी केली. त्यामुळे मयंकला लवकरच लॉटरी लागू शकते. तर, रोहित शर्मा २०१९ मध्ये सतत क्रिकेट खेळत आहे, त्यामुळं त्याला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकते. त्यामुळं रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार नाही.