फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे युवती सभेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात सौ. हिरकणी पाटील यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित विद्यार्थिनींना “त्वचेची काळजी व जागरूकता” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील होत्या. यावेळी त्वचासंवर्धनासोबतच आत्मजाणीवेवर भर देत उपस्थितांना व्यावहारिक आणि वैयक्तिक विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख वक्त्या सौ. हिरकणी पाटील यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले की, सौंदर्यप्रसाधने वापरण्यापूर्वी आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांमध्ये कोणते घटक असतात आणि ते आपल्या त्वचेला कितपत अनुकूल आहेत, याचा विचार करूनच सौंदर्यप्रसाधनांचा वापर करावा, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘स्व-जाणीव’ या संकल्पनेवर भर दिला. विद्यार्थिनींनी स्वतःची ओळख निर्माण करताना आत्मविश्वास वाढवावा, स्वतःच्या सामर्थ्यांची जाणीव ठेवावी आणि त्यानुसार स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
युवती सभाप्रमुख डॉ. जयश्री पाटील यांनी प्रास्ताविकातून सभेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी रिया पाटील हिने केले, तर आभार प्रदर्शन कांचन असटकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय सोनजे (विद्यार्थी विकास अधिकारी), डॉ. सविता वाघमारे, डॉ. सरला तडवी, डॉ. सीमा वारी, डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. आरती भिडे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. अदिती ढाके, प्रा. हेमलता पाटील, प्रा. मोहिनी तायडे, प्रा. शिवाजी मगर सर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना सौंदर्य, आरोग्य आणि आत्मजाणीवेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने युवती सभेचे आयोजन फळदायी ठरले, असे उपस्थितांनी नमूद केले.



