जळगाव, प्रतिनिधी | ग्रामसभेत वेळोवेळी प्लॅस्टिक बंदीचे महत्व पटवून देणे आवश्यक असून प्लॅस्टिक बंदीसोबतच स्वच्छता टिकविण्यासाठी कायम प्रयत्न व्हायला हवेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. २ ऑक्टोंबर रोजी जिल्हाभरात होणा-या महाश्रमदान मोहिमेच्या पूर्व तयारी बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
प. पुज्य साने गुरुजी सभागृहात झालेल्या बैठकीवेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. डि. एम. देवांग, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ऋषिकेश भदाणे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. पाटील म्हणाले की, गावात प्लॅस्टिक वापर आढळल्यास दंडात्मक कारवाई करुन त्याचे अहवालीकरण केले पाहीजे. विद्यार्थी दशेतच पत्रलेखन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छते विषयी विचार बिंबवीले गेले पाहीजे. सभागहात उपस्थित सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांनी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत दि. ११ सप्टेंबर २०१९ पासून आता पर्यंत प्लॅस्टिक बंदी, स्वच्छता श्रमदान या विषयावर काय उपक्रम व कामकाज केले याचा आढावा देवून दि. २ ऑक्टोबर रोजी महाश्रमदान कार्यक्रमाचे नियोजन विस्तृतपणे सांगितले. तसेच सकाळच्या सत्रात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतींमध्ये प्लॅस्टिक कचरा उचलून तसेच आपआपल्या विभागातील साफ सफाई करुन श्रमदान करण्यात आले.