मुंबई-वृत्तसेवा । दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात २१ एप्रिल रोजी भाजपच्या महिला मोर्चादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत आक्रमक भूमिका घेत चर्चेत आलेल्या महिलेची ओळख अखेर स्पष्ट झाली आहे. टीना चौधरी असे या महिलेचे नाव असून त्यांनी स्वतः व्हिडिओ प्रसिद्ध करत संपूर्ण घटनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. यावेळी काळी टोपी घातलेल्या एका महिलेने गाडीतून उतरून आंदोलकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “लोकांना कामावर जायचे आहे, तुम्ही आम्हाला का वेठीस धरता?” असा सवाल करत त्यांनी उपस्थित पोलिस, भाजप पदाधिकारी आणि मंत्री गिरीश महाजन यांनाही खडे बोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या पार्श्वभूमीवर टीना चौधरी यांनी व्हिडिओद्वारे सांगितले की, “त्या दिवशी मी माझ्या मुलीला म्युझिक क्लाससाठी सोडले होते आणि तिला आणण्यासाठी निघाले असताना मोर्चामुळे मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकले. जवळपास २५ मिनिटे गाडी हलत नव्हती. परिस्थिती समजून घेण्यासाठी मी गाडीतून बाहेर पडले असता रस्त्यावर बस उभ्या असल्याचे दिसले.”
त्या पुढे म्हणाल्या की, “मी जवळपास अर्धा तास पोलिसांकडे विनंती करत होते की, बस बाजूला कराव्यात. मात्र कोणीही दाद देत नव्हते. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी मी बाटली फेकली, पण ती कुणावरही फेकलेली नव्हती.”
आपल्या कुटुंबाच्या लष्करी पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी गणवेशधारी अधिकाऱ्यांनी जनतेशी जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “गणवेश म्हणजे सेवा, अधिकार नव्हे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मोर्चात ते एकमेव व्यक्ती होते ज्यांनी माझे म्हणणे ऐकले. त्यांच्या सूचनेनंतर बस बाजूला करण्यात आल्या आणि वाहतूक सुरळीत झाली.”
दरम्यान, या घटनेवरून सुरू झालेल्या राजकारणावरही टीना चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. “माझ्या नावाचा वापर करून कोणीही राजकारण करू नये. नागरी प्रश्नांवर प्रत्येकाने स्वतःचा आवाज उठवायला हवा,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.



