जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेतून पडलेल्या अनोळखी तरूणाची ओळख पटविण्यात जळगाव रेल्वे पोलीसांना यश आले आहे. राहूल चंद्रकांत गुप्ता (वय-५०) रा. गोपीसदन, केडीया प्लॉट आकोला असे मयत तरूणाचे नाव असून ही बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून जळगाव लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वे स्थानक जवळील रेल्वे खंबा क्रमांक ३८५ / १३ जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने राहूल गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती. याबाबत माहिजी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलीसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. सुरूवातीला अनोळखी म्हणून लोहमार्ग पोलीसात नोंद केली होती. त्यानंतर मयत तरूणाच्या खिश्यात जालना येथील रेल्वे स्टेशनचे प्लॅटफार्म टिकीट आढळून आले.
त्यानुसार राहूल चंद्रकांत गुप्ता (वय-५०) रा. गोपीसदन, केडीया प्लॉट आकोला असे मयताचे नाव निष्पन्न झाले. राहूल हा घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्यांची बहिण महिमा ललवाणी यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून ओळख पटविली. त्यानुसार शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक हिरालाल चौधरी हे करीत आहे.