जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून श्रींच्या घरगुती मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन कसे करावे याचे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
याप्रसंगी रसायनशास्त्र विषय इन्चार्ज प्रा.राजश्री महाजन यांनी श्रींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्ती नदी-तलावात विसर्जित करून जलस्त्रोत दूषित न करता, दुर्मिळ जैव विविधतेच्या अस्तित्वास हानी न पोहचविता अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणामध्ये सदर मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले.
त्यासाठी त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मूर्तींचे विघटन कसे होते ते दाखविले. या प्रयोगात तयार होणाऱ्या अमोनियम सल्फेटच्या द्रावणाचा उत्तम खत म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. याद्वारे नदी व तलावातील पाण्याचे होणारे प्रदूषण टाळता येऊ शकते. अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.