जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात मित्रांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये थांबलेल्या एकाच्या बॅगेतून सोनसाखळी, दोन सोन्याचे पेंटल असा एकुण १ लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी २१ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. मुद्देमालाची चोरी करणाऱ्या हॉटेलच्या रिशेप्शनिस्टला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन धोंडू पाटील वय २९ रा. पाळधी ता. मुक्ताईनगर असे अटक केलेल्या रिशेप्शनिस्टचे नाव आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेलीमाहिती अशी की, राहूल मधुकर जाधव रा. साक्री ता. धुळे हा तरूण नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्याला आहे. जळगाव येथे मित्रांना भेटण्यासाठी राहूल जाधव हा २० मे रोजी जळगावातील हॉटेल स्टार पॅलेस येथे थांबलेला होता. दरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याने त्याची बॅग ही हॉटेलच्या रिशेप्शन काऊंटरवर ठेवलेली होती. त्यानंतर हॉटेलच्या बेसमेंटला असलेल्या सिंधू हॉस्पिटल येथे दाखल झाले. उपचारा घेतल्यानंतर मंगळवारी २१ मे रोजी दुपारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते बॅग घेण्यासाठी रिशेप्शन काऊंटरला आले. त्यावेळी त्यांनी बॅगेत ठेवलेले सोनसाखळी, दोन सोन्याचे पेंटल असा एकुण १ लाख ७० हजारांचा ऐवजाची चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सलीम तडवी, जुबेर तडवी, अमित मराठे, मिलींद सोनवणपे, तुषार पाटील, जयेश मोरे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर स्टार हॉटेलमध्ये काम करणारा केतन धोंडू पाटील वय २९ रा. पाळधी ता. मुक्ताईनगर याला अटक केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहे.