न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी मागितली लाच; एका जणासह पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळयात

परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाळूचा पकडलेला ट्रक सोडवण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी लाच मागणाऱ्या आणि ती स्वीकारणाऱ्या या दोघांनाही परभणीच्या लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. रिपोर्ट सादर करण्यासाठी खासगी इसमाच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आली होती. त्यापैकी 50 हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

परभणीच्या मानवत पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे याने 1 लाखांची लाच मागितली. तडजोडी अंती 70 हजार ठरले आणि त्यातील 50 हजार रुपये खाजगी इसमाद्वारे स्वीकारल्या प्रकरणी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघानांही पडकले. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मानवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गजानन रामभाऊ जंत्रे आणि मानवत येथील खाजगी नोकरदार मंतशिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बुभाई यांनी तक्रारदाराकडून वाळूचे जप्त केलेले ट्रक सोडवण्याकरीता 1 लाख रूपयांची लाच मागितली होती. न्यायालयात ट्रक सोडविण्यासाठीचा अहवाल सादर करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जंत्रे यांनी खाजगी इसमाकडे तडजोडीअंती 70 हजार रूपये देण्यास सांगितले.

ठरलेल्या रकमेपैकी 50 हजार रूपये न्यायालयाच्या निकालाच्या आधी आणि 20 हजार रूपये निकालानंतर देण्याचे ठरले. सदरील बाब तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. त्या सापळ्यात खाजगी इसम 50 हजार रूपये स्वीकारून पळून गेला. त्यानंतर मानवत शहरात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मोठ्या शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले. मानवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या कारवाईसाठी नांदेड परिक्षेत्राचे एसीबीचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांनी सापळा रचत कारवाई केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Protected Content