शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी; सेन्सेक्स ३९ हजारांवर

share market

मुंबई (वृत्तसंस्था) नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 320 अंकांनी वाढला तर निर्देशांक 38, 993 स्थिरावला होता. हा सेन्सेक्सचा हा रेकॉर्ड मागील 29 ऑगस्ट 2018 च्या तुलनेत अधिक होता. त्यानंतर काही मिनिटांतच सेन्सेक्सने 39 हजार निर्देशांकाचा टप्पा पार केला. शेअर बाजारात पहिल्यांदाच सेन्सेक्सने हा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

आज सकाळी १०.१८ वाजता सेन्सेक्सने नवा विक्रम प्रस्थापित केला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने ३९ हजारावर उसळी घेतली. मात्र त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण झाली. पण तरीही सेन्सेक्स १८५.९७ अंकांनी मजबूत होऊन ३८,८५९.८८ अंकांवर पोहोचला. ४१.३ अंकांच्या वाढीसह निफ्टीनेही ११,६६५.२० अंकाचा टप्पा गाठला. या पूर्वी ९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदा ३८ हजाराची उसळी घेतली होती. दरम्यान, या आठवड्यात आर्थिक घडामोडींबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात त्याचा परिणाम शेअर बाजारवर झालेला दिसू शकतो. आरबीआईची 2 एप्रिल रोजी बैठक होणार असून यामध्ये एमपीसीबाबत निर्णय होऊ शकतो. त्याचसोबत आरबीआयद्वारे व्याजदरातील रेपो रेटमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. याआधी 7 फेब्रुवारी रोजी रेपो रेटमध्ये 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांपर्यत घट करण्यात आली होती. तसेच भारतात सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारात अनेक उलाढाली होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

परदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि देशांतर्गत चलनाला आलेल्या मजबुतीमुळे सेन्सेक्सने उसळी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शेअर बाजारात टाटा मोटर्स, वेदांता लिमिटेड, टाटा स्टील, एलटी, आयसीआयसीआय बँक, एमअँडएम, भारती एअरटेल, एसीएल टेक, इन्फोसिस, हिरो मोटो कॉर्प,एसबायएन, मारुती टीसीएस, एशियन पेंट, हिंदूस्थान युनिलिव्हर, सन फार्मा, एचडीएफसी बँक, आयटीसी, बजाज ऑटो आणि रिलायन्सच्या शेअरांमध्ये तेजी होती. तर अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, येस बँक, कोटक बँक, इंड्सइंड बँक, एनटीपीसी, कोल इंडिया, ओएनजीसीचे शेअर लाल निशाण्यावर होते.

Add Comment

Protected Content