पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठेतील गोविंद नगरमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याठिकाणी दोन जिवंत साप आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोविंद नगर येथे रहिवास असलेल्या ठिकाणी भले मोठे पाण्याचे डबके साचले असून या पाण्याच्या धक्क्यामुळे डासांचा उद्रेक होत असून या डासांमुळे साथीच्या आजारांची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसापूर्वी याच परिसरात एक साप मारण्यात आला असून या डब्यातच असलेल्या सिमेंटच्या पाईपावर आजही दोन साप जिवंत आहेत परिसरात रहिवास असल्याने लहान-मोठे लोकांसह येणाऱ्या जाणाऱ्यांची या ठिकाणी वर्दळ असते. मात्र या सापांनेमुळे परिसरात राहणारे लोक भयभीत झाले असून या सापांना बाहेर सोडून लोकांच्या जीवितास होणारी हानी टाळावी, अशी विनंती गोविंदा नगरातील रहिवाशांनी केली. तसेच साचलेले घाण पाण्याचे डबके तात्काळ बुजून डासांच्या होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी व साथीचे आजार होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी मागणी गोविंद नगरातील ग्रामस्थांनी केली आहे. तरी ग्रामपंचायतीने याबाबत त्वरित दखल घ्यावी अण्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकास सामोरे जावे लागणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.