जळगाव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधींजीच्या पुण्यतिथीनिमित्त “महात्मा को नमन” चित्रप्रदर्शनाचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात करण्यात आले होते. या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळत असून खास लोकांच्या आग्रहास्तव काव्यरत्नावली चौकाजवळील भाऊंच्या उद्यान येथे दि.6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. भाऊंच्या उद्यानाच्या परिसरातील नागरिकांनाही प्रदर्शनाची अनुभूती घेता येणार आहे.
या प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या निर्वाणानंतरच्याबाबी जसे की, अंतिमयात्रा, अंतिमसंस्कार, अस्थिकलश यात्रा, अस्थिविसर्जन व त्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींसोबतच महनीय व्यक्तिंनी वाहिलेली श्रद्धांजली इत्यादिचा समावेश यात असणार आहे. वैश्विक पातळीच्या अनेक बाबी बघण्याची अनमोल संधी या निमित्ताने जळगावकरांसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनने उपलब्ध केली आहे. महात्मा गांधी उद्यानातील ह्या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खास लोकांच्या आग्रहास्तव ‘महात्मा को नमन’ हे प्रदर्शन भाऊंचे उद्यान येथे दि.6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पाहता येणार आहे.
‘महात्मा को नमन’प्रदर्शनात काय पाहणार
महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या आणि गांधी विचारांना, कार्याला मानणाऱ्या देश-विदेशातील नोबेल पारितोषिक विजेते, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तत्वज्ञ आदींनी गांधीजींच्या जीवनाबद्दल काढलेले गौरवोद्गार यांचा उल्लेख असलेले फ्लेक्स पाहता येणार आहे. महात्मा गांधीजींची अंतिम यात्रा ‘न भूतो, न भविष्यती’ अशी झाली होती. ही यात्रा किती लांब होती. महात्माजींच्या अंतीम यात्रेसाठी कोणती गाडी वापरली होती. यांसारखे अनेक उत्कंठावर्धक ऐतिहासिक दुर्मिळ क्षण ‘महात्मा को नमन’ या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे गांधीजींच्या अंतिम दर्शनाच्या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन संरक्षण विभागाने केले होते. स्वातंत्र प्राप्ती नंतर प्रथमच एव्हढी मोठी, संवेदनशील जबाबदारी संरक्षण विभागाने पेलून सक्षमतेचा संदेश दिला होता. ‘महात्मा को नमन’ हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळात जळगावकरांसाठी खुले असून याठिकाणी भेट द्यावी; असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांचे अभिप्राय
·‘महात्मा को नमन’ ह्या प्रदर्शनास भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा इतिहास जागृत करणारे हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ठ आहे. असा अभिप्राय पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिला आहे.
·महात्मा गांधीजींचा जिवन चित्रपट व त्यांचा इतिहास हा उद्यानामध्ये ‘महात्मा को नमन’ या पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविला गेला. त्यामुळे लहान मुलांसाठी, प्रौढांसाठी विशेषतः तरूणांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहे. गांधीजींचे विचार अमर असून त्यांचे साहित्य, दुर्मिळ फोटो, संकलन करून प्रदर्शनातून महात्मा गांधीजींचे दर्शन घडविणाऱ्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे धन्यवाद. असा अभिप्राय धरणगाव येथील अरूण शिंदे यांनी अभिप्राय नोंदविला आहे.
·महात्मा गांधी यांच्या विषयीची दुर्मिळ माहीती या चित्रांमार्फत समजली. विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया वाचून आजही असे वाटते की आपण अनमोल व्यक्तीपासून वंचीत झाला आहे. या सादरीकरण केल्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनचे आभारी आहोत कारण त्यांनी यातून संदर्भासहीत इतिहासाची उकल केली आहे. असा अभिप्राय विटनेर येथील साई बहुउद्देशीय संस्थेचे एस. पी. ठोंबरे यांनी नोंदविला आहे.
·महात्मा गांधीजींबद्दल काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून समजल्यात. गांधी रिसर्च फाऊंडेशच्या सुप्त उपक्रमाचे करावे तितके कौतूक कमीच आहे. गांधीजींचे विचार हे अमर आहेत. असा अभिप्राय जळगाव मधील सुभाष नारखेडे यांनी नोंदविला आहे.
·गांधी रिसर्च फाऊंडेशन यांनी महात्मा गांधी उद्यान येथे ‘महात्मा को नमन’ प्रदर्शन आयोजीत केले असता प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रथमच गांधी उद्यान येथे आलो. ३२ फोटो मार्फत ७१ वर्षापूर्वी घडलेली घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार झाल्यासारखे वाटले. असे भावविश प्रदर्शन प्रत्येकाने पाहावे, असा अभिप्राय जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागातील सांख्यिकी अधिकारी आर. आर. वाणी यांनी नोंदविला आहे.
·मला जितके महात्मा गांधी यांच्याबद्दल एव्हाना जे आपण पाठ्यपुस्तकामध्ये शिकलो वा पाहिले त्यापेक्षा गांधी रिसर्च फाऊंडेशन यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेले प्रदर्शन खरेच वाखाण्यासारखे आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगले आचार विचार मिळतील आणि हे प्रदर्शन पाहून मी कृतार्थ झाले याबद्दल फाऊंडेशनचा धन्यवाद. असा अभिप्राय महावितरणचे ज्युनियर इंजिनियर डी.पी. बारवकर यांनी नोंदविला.