पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने पालखी मिरवणूक, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.श्री संत रुपलाल महाराज यांची जन्मभूमी पहूर पेठ असून, त्यांनी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शिकवणीनुसार धर्मप्रसाराचे कार्य केले. त्यांना राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी शिष्यत्व प्रदान केले होते. विदर्भ ही त्यांची कर्मभूमी राहिली असून, अंजनगाव सुर्जी येथे त्यांनी महासमाधी घेतली.
आजच्या सोहळ्यात श्री संत रुपलाल महाराज जन्मभूमी स्थळापासून भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निमित्ताने पहूर येथे लक्ष्मीनगरात श्री संत रुपलाल महाराज यांचे मंदिर लोकसहभागातून उभारले जात आहे. शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत रुपलाल महाराज जन्मभूमी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल ताडे, उपाध्यक्ष भगवान आगे, सचिव एकनाथ नागपुरे यांच्यासह टाळकरी मंडळ, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. भाविकांनी पालखी मिरवणुकीचे दर्शन घेत भक्तिभावाने पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाले.