मुंबई प्रतिनिधी । पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खातेधारकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केले. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचे काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केले आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी मागणी खातेदारांकडून करण्यात आली. मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नसल्याचं सीतारामन यांनी म्हटले आहे.
काय आहे पीएमसी बँक प्रकरण?
पीएमसी बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसताना ही माहिती आरबीआयपासून लपवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. या सगळ्यामुळे ४३३५ कोटी रुपयांचा तोटा बँकेला झाला. याच पैशांमधून हा गैरव्यवहार झाला. हा सगळा गैरव्यवहार हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीच्या पुढाकारातून झाला. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी केला.