‘गुगल पे’ ॲप आता सशुल्क

पुणे वृत्तसंस्था । नोटबंदीनंतर जवळजवळ प्रत्येक नागरिकाच्या मोबाइलवर असलेल्या ‘गुगल पे’ अॅपवरून केलेल्या व्यवहारांसाठी आता पैसे पडणार आहेत. काही बँकांनी आता या सेवेसाठी दर आकारायला सुरुवात केली असून विशिष्ट व्यवहार केल्यानंतर नागरिकांना पैसे भरावे लागणार आहेत.

आता अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे. तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे. असंख्य ग्राहकांना आता ‘गुगल पे’ वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

बँकांनी महिन्याला २० व्यवहारांची मर्यादा ठेवली असून हे व्यवहार चार-पाच दिवसांतच पूर्ण होतात. उरलेले दिवस जे व्यवहार होतील त्यावर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. गुगल पे आणि बँकांकडून यासंबंधी ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.

यामुळे आता मोफत सेवा देणाऱ्या इतर पर्यायांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत नागरिकांनी ‘गुगल पे’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक कोणत्याही सूचना न देता व्यवहारांवर शुल्क आकारणे ही एकप्रकारची फसवणूक असून लाखो नागरिकांकडून आकारण्यात येणारे कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न बँक आणि ‘गुगल पे’ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

फोन पे आणि केंद्र सरकारचे भीम अॅप हे पर्याय उपलब्ध असून याद्वारे व्यवहार केल्यास अद्याप कोणतेही दर आकारण्यात येत नाहीत. गुगल पे इतकीच ही अॅपदेखील वापरण्यासाठी सुरक्षित आहेत.

Protected Content