सरकारतर्फे जरांगे पाटलांना आरक्षणाचा जीआर सुपुर्द !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकार मराठा आरक्षणाची मागणी मान्य करत असल्याचा जीआर आज जारी करण्यात आला असून आज याची प्रत मनोज जरांगे पाटील यांना सुपुर्द करण्यात आला.

राज्य शासनासोबत यशस्वी चर्चा झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज मराठा आरक्षणाबाबतचा नवीन जीआर घेऊन राज्य सरकारचं शिष्ठमंडळ आज मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहचले. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजी महाराज नगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा सहभाग होता. याप्रसंगी  सरकारच्यावतीने जरांगे यांना जीआरची प्रत सोपवण्यात आली.

यावेळी संदिपान भुमरे म्हणाले की, हा जीआर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठीचा आहे. हा जीआर पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. पहिल्यांदा मराठवाड्यासाठी होता. आता लवकरात लवकर समिती काम करेल. तसेच, २४ डिसेंबर आणि २ जानेवारी या तारखांमध्ये फारसा फरक नसल्याचेही भुमरे याप्रसंगी म्हणाले. राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.

Protected Content