चाळीसगाव (प्रतिनिधी) आजच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व कळणे व पटणे गरजेचे असून सुरेख व सुवाच्य हस्ताक्षर हाच खरा हस्ताक्षराचा दागिना आहे, असे प्रतिपादन सोनल वाघ यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आयोजित “सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना” या विषयावर राष्ट्रीय कन्या शाळेतील विद्यार्थीनींशी सोनल वाघ यांनी संवाद साधला.
यावेळी प्राचार्या साधना बारवकर, उपप्राचार्या कुसुमावती पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, सचिव रोशन ताथेड, प्रकल्प प्रमुख समकित छाजेड, सहायक प्रकल्प प्रमुख स्वप्नील कोतकर, हरिष पल्लण, बलदेव पुन्शी, राजेंद्र कटारिया, सुभाष जाधव, मधुकर कासार, पर्यवेक्षक संजय जाट, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता पाटील आदी उपस्थित होते. सुयोग्य व वळणदार पद्धतीने स्पष्ट, स्वच्छ, वाचता येईल व ठरावीक वेळेत लिहून सुद्धा होईल यासाठी एकसारख्या रेषा व आकार काढून व व्याकरणाचे नियम पाळून काढलेले अक्षर म्हणजेच सुंदर हस्ताक्षर होय. याचे अनेक फायदे आहेत. अक्षरांतील काना, वेलांटय़ा, रफार, अक्षरातील रेषा व गोलाकार आकार, त्यांचा जाडेपणा, लांबी व रुंदी यात एकसारखेपणा शिकवून लिखाणाचे सादरीकरण सुद्धा उत्तम करायला हवे यासाठी एकाग्रता महत्वाची आहे. वेळेचे महत्व व नियोजन योग्य आखल्यास सोप्या पद्धतीने अक्षरांच्या माध्यमातून प्रगती साधू शकतो. अक्षर सुंदर हवे असेल, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या प्रयत्नांना योग्य दिशा देण्यासाठी आज हस्ताक्षर सुधारणा महत्वाची आहे असे मत सोनल वाघ यांनी यावेळी व्यक्त केले.
आज बरेच पालक आपल्या पाल्याचे अक्षर चांगले नाही, म्हणून त्रस्त आहेत यासाठी जेव्हा मुलांना अक्षर ओळख होते तेव्हापासूनच सुवाच्य व वळणदार अक्षर काढण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे असे डॉ. संदिप देशमुख यांनी सांगितले तर सुंदर हस्ताक्षरासाठी पाल्यांकडून नियमित सराव करून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या युगात प्रेझेंटेशन म्हणजेच सादरीकरणाला महत्त्व असल्याचे कुसुमावती पाटील यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समकित छाजेड यांनी करुन दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता पाटील यांनी व आभार वंदना निकम यांनी मानले.