मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अतिशय भयंकर उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्यांना आनंदाची बातमी असून अंदमानात सरी कोसळल्या असून लवकरच महाराष्ट्रातही पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
आज अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहे. अंदमानात आज तर केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील विदर्भाच्या काही भागांतही ढगांचे वातावरण आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसेच, राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ’यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.