मुलींनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा व अग्नीडाग

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । कोरोनावर विजय मिळविल्यानंतर यशस्वीरित्या पुढील उपचार घेत असलेल्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुहासिनी जोशी यांच्या मृत्यू झाला. आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान, तिन्ही बहिणी आईच्या खांदेकरी बनल्या अन् अग्निडाग दिला. तथापि, मुलींनी हे कार्य करुन समाजासमोर समतेचा संदेश दिला आहे.

दरम्यान, पहूर येथील आर.टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुहासिनी वसंत जोशी यांना वीस दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती . जळगांव येथील खासगी रुग्णालयात  उपचारादरम्यान त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली होती . रुग्णालयातच पुढील उपचार सुरू असताना काल ( ता .२५ ) रोजी त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.  

आज (ता. २६ ) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पहूर पेठ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी त्यांच्या ए.पी. आय. अपर्णा जोशी , प्रज्ञा जोशी आणि नमिता जोशी या तिघी मुली त्यांच्या खांदेकरी बनून त्यांनी अग्नीडाग दिला . या पूर्वीही वडिल वसंत पंढरीनाथ जोशी यांच्या मृत्यू प्रसंगी त्यांनी वडिलांना अग्नी दिला होता.

मूलींनाच मुलांप्रमाणे मानून त्यांना शिक्षण देऊन कै.वसंत जोशी सर,व कै.गं. भा. सुहासिनी वसंत जोशी या जोशी  कुटुंबीयांनी पहूर गावात नवा आदर्श निर्माण केला . ज्येष्ठ कन्या अपर्णा जोशी या मुंबईत चेंबुर गुन्हे शाखेला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. द्वितीय कन्या प्रज्ञा जोशी या सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिक्षण निरिक्षक पदी कार्यरत असून तृतीय कन्या नमिता जोशी या पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.

वंशाला दिवा हवा म्हणून मुलगाच पाहीजे  हा विचार दूर करून समाजाने मुलींना जन्म घेण्याचा हक्क देऊन त्यांना योग्य शिक्षण दिले तर मुली या नक्कीच मुलांपेक्षा एक पाऊल पुढेच राहतात व मुलीही वंशाचा दिव्यापेक्षा कमी नाही.  याचीच प्रचिती  या प्रसंगी उपस्थितांना आली.

 

Protected Content