जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इन्स्टाग्रामवर ओळख तयार करून तुला गिप्ट पाठवतो असे सांगून तरूणीची तब्बत ६ लाख ४९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एका गावात २७ वर्षीया तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये तिची एका डॉ. मार्क नावाच्या व्यक्तीने तरूणीशी इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून मैत्री केली. त्यानंतर त्याने तरूणीचा व्हॉटसॲप नंबर मिळविला. त्यानंतर तरूणीचा विश्वास संपादन करून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगून वेळोवेळी तरूणीकडून तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागवले. तसेच पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट न पाठवता तरुणीची फसवणूक केली. याप्रकरणी बुधवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. मार्क नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे हे करीत आहेत