जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी चोरी केल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आकाश संजय नागपुरे (वय १९, रा. शिरसोली ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील जळके पाटील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे किरण हिलाल चिमणकारे यांच्या मालकीची दुचाकी २४ जून रोजी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी शिरसोली येथील आकाश नागपुरे याने चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.
त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करीत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास आकाशच्या गावातूनच मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.