पुणे, वृत्तसेवा | नागरिक भाजपा आणि शिवसेनेच्या कारभाराबद्दल जाहीरपणे बोलत असून यंदाच्या निवडणुकीत आघाडीला १७५ जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचाररॅली दरम्यान ते बोलत होते.
राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी भाजपा आणि सेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतदेखील घोषणा करण्याचं काम करत आहे. भाजपाने पाच रुपयात तर शिवसेनेने १० रूपयात जेवणाची थाळी, एक रुपयात आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी आश्वासनं दिली आहेत. हे सर्व मागील पाच वर्ष सत्ता असतानाही करू शकले असते, तेव्हा त्यांनी झोपा काढल्या का?.” अशा शब्दांत अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपा आणि सेनेवर टीका केली. यावेळी पवार यांनी सांगितलं की, राज्यात मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. यासह अनेक समस्यांना जनतेला सामोरं जावं लागत आहे. मात्र यावर सत्ताधारी भाजपा आणि सेनेकडून काहीही बोलण्यास कोणी तयार नाही. मात्र सध्या राज्याच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपाकडून ३७० या राष्ट्रीय मुद्दयावर चर्चा घडवून आणली जात आहे. त्यापेक्षा राज्यातील प्रश्नावर त्यांनी बोलण्याची गरज आहे. मात्र हे होताना, दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असलेल्या त्या ठिकाणापासून काही अंतरावर एका तरुण शेतकऱ्याने भाजपाचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली आहे. एवढी मोठी घटना घडली असताना, मुख्यमंत्री त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले नाही, अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर सभा घेत आहेत. त्या सभांमध्ये आम्हाला विरोधक दिसतच नाहीत असे वारंवार सांगत आहेत. जर विरोधक मैदानात नाहीत, तर राज्यात इतक्या सभा का घेत आहेत? केंद्रातून इतके मंत्री कशासाठी येत आहेत? मोदी, अमित शहा कोणासाठी सभा घेत आहेत? निवडणुकीच्या आधी महाजनादेश काढण्याची आवश्यकत का भासली?, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.