बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजनेचा पहिला लकी ड्रा ७ एप्रिल २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या ड्रा अंतर्गत राज्यभरातील विजेत्यांना स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. योजनेनुसार, प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्यांना स्मार्टफोन मिळेल. तसेच, दुसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे १,३०२ विजेत्यांना स्मार्टफोन आणि तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे १,३०२ विजेत्यांना स्मार्ट वॉच प्रदान केले जाणार आहे. पुढील लकी ड्रॉ मे आणि जून २०२५ मध्ये घेतले जातील.
महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन अथवा तीनपेक्षा अधिक वेळा वीज बिल ऑनलाईन भरलेल्या ग्राहकांना लकी ड्रा साठी पात्र ठरता येईल. ही योजना लघुदाब चालू वीज ग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४) दरम्यान एकदाही ऑनलाईन वीज बिल भरलेले नाही, त्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
ग्राहकांची वेळ, मेहनत आणि पैसा वाचावा यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना ०.२५% सवलतही दिली जाते. सध्या राज्यातील ७०% हून अधिक ग्राहक डिजिटल पद्धतीने वीज बिल भरत आहेत. हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी महावितरणने ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना राबवली आहे. ग्राहकाने लकी ड्रा साठी पात्र होण्यासाठी खालील ऑनलाईन पेमेंट पर्याय वापरणे आवश्यक आहे :नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस.
ग्राहकांनी सलग तीन किंवा त्याहून अधिक महिने दरमहा एकप्रमाणे वीज बिल ऑनलाईन भरल्यास ते या योजनेत सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला www.mahadiscom.in भेट द्यावी.