….. त्या उपोषणकर्त्या वृध्द महिलेची तब्बेत खालावली

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. येथील मागासवर्गीय वृद्ध महिलेने भोगवटा असलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेल्या वृद्ध महिलेची तब्बेत खालावली आहे

पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. येथील मागासवर्गीय वृद्ध महिलेने भोगवटा असलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून महिलेने अन्नपाणी न घेतल्याने महिलेची प्रकृती खालावली असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इम्रान शेख यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता महिलेस मोठ्या प्रमाणात अशक्तपणा असल्याचे सांगून तीच्या पोटात अन्न पाणी नसल्यामुळे अशक्तपणा आल्याचे सांगितले. उपोषणकर्त्या महिलेच्या शरीरात ताकत नसल्याने तिला बसून राहणे अशक्य झाले आहे.

तालुक्यातील सांगवी प्र.लो. येथील विमलबाई गोबा मांग या महिलेच्या ग्रामपंचायत नमुना क्रं. ८ नुसार नावे असलेली २ हजार ४०० स्केअर फुट भोगवटा असलेली जागा असून सदर जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी महिलेने ग्रामपंचायती सह प्रशासनास अनेक वेळा लेखी व तोंडी सांगितले आहे. मात्र ग्रामपंचायतीने अतिक्रमण न काढल्याने महिलेने पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून २२ तारखेपासून तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

दरम्यान गटविकास अधिकारी अतुल पाटील व विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी उपोषणा स्थळी जावून महिलेला उपोषण सोडण्यासाठी मनधरणी केली. यावेळी विमलबाई गोबा मांग यांनी मला ग्रामपंचायत अतिक्रमण काढणार असल्याचे लेखी हमीपत्र द्या असे सांगितले. या अगोदर पंचायत समिती ने ग्रामपंचायतीस दोन वेळा अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पत्र व्यवहार केल्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी पवार व विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी स्वतः गावी जावून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला असता अतिक्रमण धारकांनी गोंधळ घालून अतिक्रमण काढण्यास मज्जाव केला होता. महिलेने चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.

Protected Content