पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिक्षण क्षेत्राची पत प्रतिष्ठा धुळीस मिळवत, पहूर (कसबे) येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात झालेल्या बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणाने संपूर्ण जामनेर तालुक्यात खळबळ उडवली आहे. शिक्षण विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवत संस्थेने 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मिळालेल्या मान्यतेपेक्षा अधिक कर्मचारी भरती करून, फेब्रुवारी 2025 मध्ये शाळार्थ प्रणालीवर बनावट वेतनपत्रक सादर करत लाखो रुपयांचा वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे.
तपासणीतून समोर आलेल्या माहितीनुसार, संस्थेला मान्यताप्राप्त दहा शिक्षक व तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीच भरती करता येणे अपेक्षित होते. मात्र यापैकी एक शिक्षकाचे पद रिक्त असूनही, फेब्रुवारी 2025 च्या वेतनात 16 शिक्षक व 4 शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 20 कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. यात सात शिक्षक व एक शिपाई यांची भरती बोगस पद्धतीने केल्याचे ठोस पुरावे मिळाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक मधुकर पवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. शासनाच्या 2012-13 च्या आदेशानुसार शिपाई भरती बंद असूनही, अशा प्रकारे भरती कशी झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षण क्षेत्र हे पवित्र मानले जाते. मात्र अशा प्रकारच्या बनावट भरती घोटाळ्यांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. संबंधित संस्थेतील अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती ही शासनाच्या अधिकृत पोर्टलद्वारे व पारदर्शकतेने होणे अनिवार्य आहे. मात्र या प्रकरणात सात शिक्षक व एक शिपाई यांची भरती पूर्णतः बेकायदेशीर पद्धतीने केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची तक्रार राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी मधुकर पवार यांनी केली आहे. या घोटाळ्याच्या बातमीने संपूर्ण जामनेर तालुक्यात खळबळ उडाली असून, अशाच प्रकारे इतर शाळांमध्येही बोगस भरती झाली असल्याच्या शक्यता नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.