वैचारिक दृष्टिकोन देण्याच्या कामातून समितीचा विस्तार ३४ वर्षात वाढला -अविनाश पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंधश्रद्धा निर्मूलन करणे एवढंच काम समितीचे नाही तर सामाजिक व वैचारिक दृष्टिकोन देण्याचं काम समिती करते. गेल्या ३४ वर्षात समितीचे कामकाजाचा विस्तार झाला आहे. समाजामध्ये वैचारिक भूमिका मांडून समाज सुधारण्याचे काम सातत्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक जळगावात १३ व १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी मंचावर राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, चौघे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशीलकर, संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमिवंत धांडे, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी. एन. पाटील व नाना लामखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी उपस्थित होते.

सुरुवातीला चमत्कारिक घंटा वाजवत बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेमधून जळगाव जिल्हाविषयी माहिती देत १४ वर्षानंतर ही बैठक आयोजित करण्याची संधी मिळाली अशी माहिती रवींद्र चौधरी यांनी दिली.

यानंतर माधव बावगे यांनी चळवळीच्या वाढत्या विस्ताराबाबत माहिती सांगून समितीच्या कार्यकर्त्यांना अधिक सजग राहून विविध उपक्रम राबवावे लागतील, असे सांगितले. कार्यकर्त्यांनी चिकाटीने व धैर्याने शाखेचे कामकाज सातत्याने सुरू ठेवावे अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर जिल्हाध्यक्ष नेमिवंत धांडे यांनी सांगितले की, जळगावमध्ये राज्याची बैठक आयोजित होणे हे शाखेसाठी खूप महत्त्वाचे असते. शाखा वृद्धीसाठी व कार्यकर्त्यांच्या विकासासाठी समितीचे उपक्रम उत्तम असतात असे त्यांनी सांगितले.

अविनाश पाटील म्हणाले की, वाढत्या सामाजिक समस्यांना सोडवण्यासाठी राज्यभरातील सामाजिक चळवळींना त्यांच्या कामामध्ये जोर धरावा लागेल. त्याशिवाय विघातक शक्तींना आळा घालता येणार नाही,असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी केले. तर आभार जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी मानले.

Protected Content