अमळनेर-मंगळग्रह मंदिराचे प्रवेशद्वार उघडले; पालखीतून श्री मंगळग्रहाची मिरवणूक

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे प्रवेशद्वार आज गुरूवार ७ रोजी सकाळी सात वाजता विधिवत रित्या व प्रचंड जल्लोषात उघडण्यात आले. यावेळी विश्वस्त व गणवेशधारी सेवेकर्‍यांनी वाद्य वाजवत व त्यावर ताल धरत प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत सजवलेला पालखीमध्ये श्री मंगळग्रहाची उत्सव मूर्ती ठेवून मिरवणूक काढली.

मिरवणुकीत पौराणिक गणवेशातील अबदागिरीधारक व ध्वजधारक विशेष लक्षवेधी होते. यानिमित्ताने मंदिराची मनमोहक रांगोळ्या व सर्वत्र फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिरात विशेष महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह अनेक भाविकउपस्थित होते. दिवसभर भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण गंध सर्वांच्या कपाळी लावण्यात आला. मुख्य पुरोहित प्रसाद भण्डारी, मंदिराचे पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, यतीन जोशी यांनी पौरोहित्य केले.

आज मंदिरांचे प्रवेश द्वार उघडले याचा आनंद आहे .मात्र त्याहीपेक्षा या निमित्ताने या प्रवेशद्वारातून पर्यटन व रोजगाराच्या संधीचे अनेक मार्ग खुले झाले याचा विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डीगंबर महाले यांनी दिली.

Protected Content