वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाशिम जिल्हयात समृध्दी महामार्गावर ट्रकला उभ्या ट्रकला मागून घेऊन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. कारंजा तालुक्यातील पोहा गावाच्या जवळ उस घेऊन जाणारा एम. एच. १६ बी.सी. ८१७४ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या उभ्या ट्रकला मागून कांदा घेऊन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की मागून येणाऱ्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. दरम्यान चालक आणि त्याचा सहकारी केबिन मध्ये फसले होते. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे.
योगेश निवृत्ती खैनार असे मृतकाचे नाव आहे. तर त्याचा सहकारी प्रदिपसिंग जसवंतसिंग मान वय ३५ वर्ष हा या घटनेत जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील १०८ रुग्णवाहिका श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका, अग्निशमन दल, महामार्ग पोलिस तसेच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली.
मात्र अपघात एवढा भीषण होता की, मागून धडक देणारा ट्रकच्या केबिनचा चुराडा होऊन तो समोरच्या उभ्या ट्रक मधील केबिनमध्ये फसला होता. त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने ट्रकला बाजूला करण्यात आले. ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने ट्रकमध्ये फसलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. बऱ्याच वेळानंतर केबिनमध्ये फसलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले पण यातील एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.