सात लाखासाठी विवाहितेचा छळ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नोकरीला असल्याचे खोटे सांगत लग्न करून फसवणूक केली. तर शिक्षक म्हणून कायमस्वरूपी होण्यासाठी सात लाख रूपये माहेरहून आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करणाऱ्या चाळीसगाव येथील पतीसह पाच जणांवर २१ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगरातील मनीषा प्रदीप निकम (वय 30) हिचा विवाह चाळीसगाव येथील प्रदीप भीमराव निकम यांच्याशी झाला. लग्ना आगोदर आपण शाळेत कायमस्वरूपी शिक्षक म्हणून असल्याचे भासवून लग्न केले. दरम्यान विवाहिता माहेरी आल्यानंतर पती कायमस्वरूपी नसल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पती प्रदीप निकम यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच कायमस्वरूपी शिक्षक होण्यासाठी माहेरहून ७ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच  सासरे भिमराव सखाराम निकम, सासू लक्ष्‍मीबाई भिमराव निकम, जेठ दादासाहेब भीमराव निकम, नणंद लता रवींद्र सोनवणे सर्व रा.  चाळीसगाव यांनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक गांजपाठ केला. तसेच विवाहितेच्या अंगावरील श्रीधन देखील काढून घेतले. या त्रासाला कंटाळून विवाहिता ही जळगाव येथील माहेरी निघून आल्या. २१ मार्च रोजी सायंकाळी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे. 

Protected Content