भुसावळ/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी १० फेब्रुवारी रोजी फिर्यादी इब्राहिम इस्माईल बागवान (वय वर्ष), रा. मुंजोबा मंदिर, पाटील मळा, भुसावळ यांच्या घरी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूम व किचनमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून १ लाख ७२ हजार ५०० किमतीचा ऐवज चोरून नेला. यात २८ हजार रुपये रोख आणि १७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी रिजवान फकीरा बागवान, रा. जाम मोहल्ला, भुसावळ याला अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार ५०० मुद्देमाल हस्तगत केला, ज्यात रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
यांनी केली कारवाई
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोख नखाने, डीवायएसवी कुष्णांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या तपासात पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, चालक सहाय्यक फौजदार हसमत अली सय्यद, पो.हे.कॉ. विजय बळीराम नेरकर, पो.हे.कॉ. रमण काशिनाथ सुरळकर, पो.हे.कॉ. महेश एकनाथ चौधरी, पो. कॉ. जावेद हकीम शाह, पो. कॉ. राहुल विनायक वानखेडे, पो.कॉ. अमर सुरेश अढाळे आणि पो. कॉ. प्रशांत रमेश परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.