रशिद तडवी यांनी केले गाईंचे विधिवत अंत्यसंस्कार

फैजपूर प्रतिनिधी । येथील गोभक्त तथा सामान्य कुटुंबातील रशिद तडवी यांच्या गाईचे आज अचानक निधन झाले. या गाईच्या निधनाने पूर्ण कुटुंबात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान, या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे फैजपूर शहरातील वेगवेगळ्या मंदिरात जाऊन ही गाय विसावा घेत होती. ही गाय म्हणजे परमेश्वरी अवतार असा रशिद तडवीचा भाव होता. येथील गजानन वाडीतील गणपती मंदिर दत्त गल्लीतील पांडुरंग विठ्ठल मंदिर खंडोबा वाडी देवस्थान या ठिकाणी नियमित ही गाय जात होती. सायंकाळी गाय घरी न आल्यास कासावीस होऊन अनेक वेळा तडवी या गाईला शोधण्यासाठी संपूर्ण गावभर फिरत असत. ही गाय म्हणजे रशिदच्या कुटुंबातील एक सदस्य होती. या गाईच्या निधनामुळे त्यांना दुःख अनावर झाले. त्यांनी या गाईचे अंत्यसंस्कार खिरोदा रोड वरील जलशुद्धीकरण केंद्र पाठीमागे खड्डा खोदून विधीवत पूजन करून केले. 

यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, हभप प्रविनदासजी महाराज, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, पत्रकार संजय सराफ, नंदू अग्रवाल, प्रा. उमाकांत पाटील, लोकेश कोल्हे उपस्थित होते. गाईच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अचानक भर उन्हामध्ये पर्जन्यवृष्टी झाली. ही पर्जन्यवृष्टी अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत सुरू होती हा अनुभव  विशेष होता. यावेळी रशिद तडवी यांना अश्रू अनावर झाले. 

महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी त्यांचे सांत्वन करून रशिदला एक हजार रुपये देऊन आशिर्वाद दिला. रशिदच्या या गो माते विषयी असलेल्या प्रेम व आपुलकीचा आदर्श प्रत्येकाने अंगिकारला तर  समाजामध्ये होणारे जातीय तेढ, मतभेद दूर होऊन सलोख्याचे संबंध निर्माण होतील असे सांगितले.

 

Protected Content