भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी येथे कारण नसताना एका महिलेसह तिच्या पतीला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात शमीनाबी आसिफ शहा वय-३० या महिला आपले पती आसिफ शाह यांच्यासह वास्तव्याला आहे. सोमवार १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता काहीही कारण नसताना याच परिसरात राहणारे मेहमूद पठाण यांचा मुलगा, भाचा आणि पुतण्या (पुर्ण नावे माहित नाही) या तीन जणांनी महिलेला शिवीगाळ केली. दरम्यान याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या महिलेचे पती आसिफ आणि महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी महिलेने रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र भावसार हे करीत आहे.