महापालिकेतील महासभेत स्वच्छता, कचरा व साफसफाईवरून नगरसेवक आक्रमक

शहर कचरामुक्त न झाल्यास उपोषणाचा नगरसेवकांचा इशारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेत महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता महासभा घेण्यात आली. या सभेत साफसफाईच्या मक्तेदाराकडून दररोज ३०० टन कचरा उचलला जात असतांना शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग कसे दिसतात असा प्रश्न नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी महासभेत उपस्थित केला. तसेच शहर कचरामुक्त न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनिल गोराणे आदी उपस्थित होते. महासभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, मनपाने साफसफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा मक्ता वॉटर ग्रेस कंपनीला दिला असून त्या मक्तेदार कंपनीकडून शहरातील साफसफाई केली जात आहे. त्या मक्तेदाराकडून दररोज ३०० टन कचरा उचल होत आहे. मात्र, तरीही शहरातील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले कसे काय दिसता, असा जाब सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर नगरसेवक इबा पटेल यांनी मक्तेदाराकडून कचऱ्या ऐवजी वेस्ट मटेरिअलची उचल होत असल्याचा व्हिडीओ महापौर व आयुक्तांना दाखविला. यावेळी याच विषयाला धरून नालेसफाईचा मुद्दा देखील चांगलाच गाजला असून महापौर जयश्री महाजन यांनी नाल्याची साफसफाई व्यवस्थित झालेली नाही, नाल्यांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसत आहे. त्यामुळे नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

Protected Content