अमळनेर प्रतिनिधी | अती महत्वाच्या वेळेस पोलीसांची मदत मिळावी यासाठी सुरु करण्यात आलेली फोन सेवा 112 या क्रमांकावर विनाकारण फोन करणे एकाला महागात पडले असून या प्रकरणी तक्रार देणाराच आला गोत्यात आल्याची घटना अमळनेर येथे घडली आहे.
जिल्हा पोलीस घटकात नागरिकांना अति तत्काळ आणि महत्वाच्या वेळेस पोलीसांची मदत मिळावी यासाठी 112 ही फोन सेवा सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशनला डायल 112 वरील कॉल अटेंड करणे करिता एक चार चाकी वाहन आणि एक मोटरसायकलवर असे दोन एम डी टी यंत्रणा कार्यान्वित आहे. सदर यंत्रणेवर दिवस-रात्र पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केली जाते. काही कॉल आल्यास सदर ठिकाणी लागलीच पोलीस मदतनीस जात असतात
आज शनिवार, दि. 22 जानेवारी 20२२ रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील डांगर या गावातील रहिवासी असलेल्या धनराज कडू भिल या व्यक्तीने आपल्या मोबाईलवरून 112 डायल करून त्या ठिकाणी भांडण होत असल्याचे सांगितले.
अमळनेर पोलीस स्टेशनहून लागलीच घटना सहा.पोलीस नाईक भामरे, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल मधुकर पाटील, पोलीस नाईक सुर्यकांत साळुंखे यांनी डांगर या गावी पाचारण केले. तक्रारदार धनराज कडू भिल यांना या संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी, “मी 112 नंबर काल डायल केला होता असं सांगत आमचं भांडण वगैरे काही झालं नसून हा क्रमांक डायल केल्यावर पोलीस येतात की नाही हे पाहण्यासाठी मुद्दामून गमतीत फोन केल्याचे सांगितले.”
यावेळी धनराज भिल दारू प्यायलेला होता याबाबत त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे निदर्शनास आले. काहीएक कारण नसताना भांडण चालू आहे याबाबत खोटी तक्रार 112 क्रमांक डायल करुन सांगतल्यामुळे त्याच्या विरोधात पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे अमळनेर पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नाईक कैलास शिंदे हे करत आहेत.
तरी डायल 112 ही अती महत्वाच्या वेळेस अशी की, “महिला छेडखानी, गंभीर स्वरूपाचा गुन्हा, चोरी, दरोडा, महिला अत्याचार, शाळकरी मुलींच्या छेडखानी संदर्भातले गुन्हे, कायदा सुव्यवस्था या संदर्भातले काही प्रश्न असतील तर अशावेळी तात्काळ पोलीस मदत मिळावी याकरता हा नंबर वापरणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच वेळा दिवाणी बाबी किंवा इतर बाबी संबंधित किंवा चेष्टा-मस्करीसाठी 112 नंबर डायल केला जातो आणि खोटी माहिती देऊन प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्यामुळे या खोट्या कारणासाठी 112 नंबर डायल केल्यास यापुढे त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अत्यावश्यक कारणासाठीच सर्वसामान्य जनतेने या क्रमांकाचा या सुविधेचा वापर करावा.” असे आवाहन अमळनेर पोलीसांनी केले आहे.