शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ३५ फुटांचा होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शरद पवार गट, ठाकरे गट व काँग्रेस यावरून आक्रमक झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद देऊन पुतळा पाडण्याचे कारण सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचे डिझाईन देखील नौदलानेच तयार केले होते. हा पुतळा कोसळल्याचे वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले”.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या तिथे नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत. उद्या नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल”.

Protected Content