नूर सुल्तान, वृत्तसंस्था | भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. विनेशने रेपेचेज मुकाबल्यात ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीला पराभूत करून ५३ किलो वजनी गटात हे कांस्य पदक पटकावले आहे. या विजयाबरोबरच २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.
या आधी अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रांटचा ८-२ ने पराभव करून विनेश कांस्य पदकासाठी पात्र झाली होती. साराने गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ५३ किलो वजनी गटात रजत पदक पटकावले होते. या आधी विनेशला जापानच्या मायू मुकैदाने पराभूत केले होते. त्यामुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमधून तिला बाहेर पडावे लागले होते. यावेळी मात्र तिला नशिबाने साथ दिली आणि रेपेचेज राऊंडमध्ये पदक मिळविता आले. त्यामुळे २०२०मध्ये प्रवेश मिळणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.