वही गायनाला राजप्रतिष्ठा व शाहीरी दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार : पालकमंत्री

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । ‘वही गायन’ ही खान्देशी मातीतील कला आहे. आज लोककला लोप पावण्याच्या मार्गावर असतांना वही गायन करणार्‍या कलावंतांच्या समोर देखील अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. यामुळे या कलेस राजप्रतिष्ठा आणि शाहीरी दर्जा मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात पार पाडलेल्या खान्देश स्तरी वही गायन स्पर्धेत बोलतांना पालकमंत्र्यांनी कला आणि संस्कृतीचे संवर्धन करणे ही आमची सर्वांची जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. तर लवकरच होणार्‍या राज्यस्तरीय वही गायन स्पर्धेला अभूतपूर्व पध्दतीत पार पाडले जाईल अशी घोषणा देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केली.

खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या संकल्पनेतून आज जळगावातील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात पहिल्या खान्देश स्तरीय वही गायन लोककलावंत परिषदेचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात लोककला सादरीकरण आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन करण्यात आले. प्रारंभी खान्देश लोककलावंत परिषदेतर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या मान्यवरांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, अखील भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष सांगलीचे संभाजीराजे जाधव, पाटील, वृध्द कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर, जेष्ठ लोककलावंत संभाजीराजे जाधव , जि प सदस्य पवन सोनवणे, सभापती पती जनार्धन पाटील- कोळी, रमेशआप्पा पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विनोद ढगे यांनी केले. सूत्रसंचालन अपूपर्वा वाणी, प्रास्ताविक विनोद ढगे यांनी कार्यक्रमाचे उद्दीष्ट जाहीर केले. व अनेक मागण्या मांडून वही गायन लोककलेस शाहिरी दर्जा देऊन राजमान्यता मिळावी अशी मागणी केली तर आभार परिषदेचे उपाध्यक्ष शेषराव गोपाळ यांनी केले.

तिघे मान्यवर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

या कार्यक्रमात खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात या वर्षीचा वहीगायन’ क्षेत्रातील पुरस्कार स्व.प्राचार्य किसन पाटील स्मृती वहीगायन जीवन गौरव पुरस्कार वाघोड ता. रावेर जि जळगाव येथील जेष्ठ वहीगायन लोककलावंत शाहीर रघुनाथ महाजन, शाहीरी क्षेत्रातील स्व. शाहीर दिलिप सखाराम जोशी स्मृती जीवन गौरव पुरस्कार नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांना तर तमाशा क्षेत्रातील स्व.नथ्थुभाऊ सोनवणे (भोकरकर) जीवन गौरव पुरस्कार एकलग्न ता. एरंडोल येथील जेष्ठ तमाशा कलावंत शाहीर बारकू जोगी यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या तिन्ही मान्यवर लोककलावंताचा सन्मान करण्यात आला. यासोबत वृध्द कलावंत समितीच्या १० अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

विनोद ढगे यांची शासकीय वही गायन महोत्सवाच्या समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात वृध्द कलावंत सन्मान समितीतर्फे ३३० कलावंतांना मानधन मिळत असून यात ६० लोककलावंत आहेत. यामध्ये २५ वहीगायन करणारे, २५ तमाशा कलावंत तर १० शाहीरांचा समावेश असून यातील दोघा कलावंताचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

खान्देशी मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणार्‍यांनी कलावंतांची फिकीर केली का ?

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी अतिशय जोरदार भाषण केले. ते म्हणाले की, वही गायन कला ही काळाच्या ओघात लोप पावण्याच्या मार्गावर आहे. रात्री वहीचे गायन करणारा हा दिवसा बेरोजगार असल्याची टीका करण्यात येते. याच आपल्या मातीतल्या कलावंतांची कुणालाही कदर नाही. अगदी खान्देशी मुख्यमंत्री हवा अशी इच्छा बाळगणार्‍यांनी कधी खान्देशी कलावंतांना न्याय मिळवून दिला का ? अशी विचारणा पालकमंत्र्यांनी करताच याला जोरदार दाद मिळाली.

लोककलावंतांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहणार !

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, लोककलावंत हे माझ्या अतिशय जवळचे आहेत. ते अडचणीत असतांना आम्ही मदतीचा हात दिला आहे. ८ नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या परिषदेत घोषणा केल्यानुसार आम्ही वारकरी भवन उभे करण्यासाठी निधीची तरतूद केली असून लवकरच लोककला भवन देखील उभारण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर विनोद ढगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उपेक्षित कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे एकत्रीकरण केल्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले.

 

Protected Content