जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईनच्या डाऊन रेल्वेरूळावर एका अनोळखी ३५ ते ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनीटांच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या डाऊन रेल्वेलाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४१५ च्या ७ ते ९ वाजेच्या जवळ एका ३५ ते ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनीटांनी समोर आली. दरम्यान, या घटनेची माहिती लोको पायलट शिवनाथ जागीर यांनी जळगाव रेल्वेस्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक एस.बी.सनस यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी जळगाव तालुका पोलीसांना कळविण्यात आले. काही वेळात पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अनिल मोरे, पोहेकॉ अनिल फेगडे, पो.कॉ. भुषण सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.