सुकी नदीच्या पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील सुकी नदीच्या पात्रात बुडून ११ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पाल येथे काल सायंकाळी घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील विवरा येथील अंजूम शेख जावेद (वय ११), हुरबानो शेख जावेद (अंजूमची आई), दोन भाऊ साद आणि उमेर, शमीमबानो (आजी), वरणगाव येथील मामी शाहिस्ताबी फजल्लोदीन, शाहिस्ताबीची दोन मुले अनुक्रमे मुलगी अमन व मुलगा अलफैज असे ८ जण गुरुवारी विवरे येथून पाल येथील नातेवाईक अकबर शेख शब्बीर यांच्याकडे गेले. तेथून अकबर यांची तीन मुले अनुक्रमे जिशान (वय १२), सारा आणि अलिया असे ११ जण पाल येथील हरीण पैदास केंद्र पाहायला गेले होते.

यानंतर हे सर्व जण सुकी नदी आणि कुसुंब्री नाल्याचा संगमावर गेले तेव्हा जिशान हा नदीपात्रात पडला. त्याला वाचवण्यासाठी अंजूम शेख जावेद ही त्याची मावसबहिणी धावून गेल्याने ती देखील पात्रात पडली. सोबत असणार्‍या तीन महिलांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात सोबत असलेले सात बालके देखील पाण्यात पडली. परिसरातील मासेमारांनी तात्काळ पाण्यात उड्या घेऊन या सर्वांना वाचविले. मात्र यात अंजूम शेख जावेद (वय११) या बालिकेचा मात्र बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.

या दुर्घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content