गिरणा नदीपात्रात अनोळखी तरुणाचा आढळला मृतदेह

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारात जलाराम मंदिराच्या मागे गिरणा नदीपात्रात आज दुपारी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा बुद्रक येथील पोलीस पाटील चंद्रकांत उत्तमराव सोनवणे यांना गावालगत असलेल्या गिरणानदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, सदरचा मृतदेह पाण्यात पडून असल्याने तो कुजला होता, तसेच त्याला दुर्गंधी सुटलेली होती. पोलीस पाटील चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस हवालदार अनिल तायडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस पाटील, चंद्रकांत सोनवणे यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वय अंदाजे २५ ते ३० वर्ष, शरीराने सडपातळ, रंगाने सावळा, चेहरा गोल, अंगात बदामी रंगाचा शर्ट, गदड बदामी रंगाची पॅन्ट असे मयताचे वर्णन आहे. या वर्णनावरुन ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.