Home पर्यावरण भेंडवळची घटमांडणी खरी ठरली! राज्यभरात जलप्रलयाने धुमाकूळ

भेंडवळची घटमांडणी खरी ठरली! राज्यभरात जलप्रलयाने धुमाकूळ

0
201


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यभरात सध्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या या पावसाच्या थैमानाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना, बुलढाण्यातील भेंडवळ या छोट्याशा गावाची पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, या भविष्यवाणीत अगोदरच राज्यात महापुरासारखी स्थिती निर्माण होईल असा इशारा देण्यात आला होता, जो अचूक ठरला आहे.

बुलढाण्यातील भेंडवळ या गावात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर “भविष्यवाणी” केली जाते. १ मे रोजी यंदाची घटमांडणी पार पडली. या पारंपरिक पद्धतीतून यावर्षी पावसाविषयी जे भाकीत करण्यात आले होते, ते अचूक ठरल्याने अनेकांचे लक्ष या भेंडवाणी पद्धतीकडे वेधले गेले आहे. या अंदाजानुसार, यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहील, मात्र पीक मध्यम असेल, तसेच अवकाळी पाऊस व पुराचा धोका राहील, असे सांगण्यात आले होते.

या अंदाजानुसारच जून महिन्यात मान्सूनने दमदार एंट्री घेतली. त्यानंतर काहीसा खंड पडला आणि जुलैमध्ये पाऊस कमी झाला. मात्र ऑगस्ट उजाडताच पावसाने पुन्हा जोर पकडला आणि संपूर्ण राज्यात जलप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बुलढाणा, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य परिस्थिती असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.

भेंडवळच्या घटमांडणीत यंदा युध्दजन्य परिस्थिती, भूकंप आणि नैसर्गिक संकटांचा इशाराही देण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांतील जागतिक घडामोडी, तसेच देशभरात अनुभवलेली भूकंपाची सौम्य तीव्रतेची झळ यामुळे हे भाकीतही काही अंशी खरे ठरत असल्याचे चित्र आहे.

या पारंपरिक पद्धतीने केलेल्या भविष्यवाणीकडे विज्ञानाची कसोटी लावली जाते, मात्र स्थानिकांनी आणि काही तज्ज्ञांनीही यामध्ये नोंद घेण्याजोग्या गोष्टी असल्याचे मान्य केले आहे. IMD कडून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी भेंडवळची ही पारंपरिक भविष्यवाणी त्याआधीच दिली गेली होती, यामुळे ही बाब अधिक चर्चेत आली आहे.

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतरच्या परिस्थितीमुळे भेंडवळची घटमांडणी आणि तिची अचूकता यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं आहे. विज्ञानाच्या प्रगतीच्या युगात अशा पारंपरिक प्रणालींकडे केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संशोधनाची गरज असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound