चाळीसगाव, प्रतिनिधी | निसर्गसौंदर्याने नटलेल्या गौताळा अभयारण्यातील पाटणादेवी परिसरातील केदार कुंड धबधबा गेल्या काही दिवसांपासून खळाळून फेसाळत डोंगर कड्याच्या कातळावरून मनसोक्त वाहतो आहे.
हा निसर्गआविष्कार पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी, हौशी पर्यटक गौताळा अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. थंडगार तुषार पर्यटकांच्या अंगावर उडवीत हा धबधबा जणू आलेल्या पर्यटकांचे स्वागतच करतो. आजूबाजूचा सर्व परिसर संपूर्णपणे हिरवाईने नटलेला असल्यामुळे धबधब्याकडे जाणाऱ्या पाय वाटेतून विविध प्रकारच्या वृक्षवल्ली यांचे मनमोहक दर्शन देखील पर्यटकांना यावेळी होते. तसेच विविध प्रकारचे पक्षी, प्राणी या अभयारण्यात असल्याने त्यांचे आवाज देखील ऐकायला येत असल्याने याचे अधिक कुतूहल पर्यटकांना वाटत आहे. चाळीसगाव तालुक्यातील या सुंदर अशा पर्यटनस्थळाकडे सध्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या परिसरात असलेल्या चंडिका देवी व हेमाडपंती महादेव मंदिर यांच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी होत आहे.