जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवार, २२ फेब्रुवारी रोजी जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान राबविण्यात आले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सेवा दलाचे जवान आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
या उपक्रमाची माहिती देताना ज्ञान प्रचारक राजकुमार वाणी यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात आज एकाच वेळी १७०० पेक्षा अधिक ठिकाणी या प्रोजेक्ट अंतर्गत जलस्त्रोतांची स्वच्छता केली जात आहे. या देशव्यापी मोहिमेला केंद्र शासनाचे मोलाचे सहकार्य लाभत असून, ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या ब्रीदवाक्याला अनुसरून मानवी मनासोबतच पाण्याचे स्त्रोत शुद्ध करण्याचा हा मानस आहे.

याप्रसंगी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी मिशनच्या या कार्याचे कौतुक करत पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सुमारे १५० सेवा दल जवान आणि भगिनींनी मेहरूण तलाव परिसरातील प्लास्टिक, निर्माल्य आणि कचरा वेचून परिसराचा कायापालट केला. गोळा केलेला हा कचरा महानगरपालिकेच्या ट्रॅक्टरद्वारे विल्हेवाटीसाठी नेण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा दल अधिकारी सुधीर सोनार, दिलीप पाटील, लखन राठोड, अनिल जोशी, अनिल पाटील, विधी आहुजा, राणी जोशी, विजय चौधरी यांच्यासह अन्य स्वयंसेवकांनी प्रचंड परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संयोजक रमेश कुमार आहुजा यांनी उपस्थित मान्यवर आणि सेवा दलाचे आभार मानले.



